|
|
| |
| अपघात प्रतिबंधक उपाय योजना व प्रवास सुरक्षितता |
| |
सर्वसामान्यपणे अपघातांची कारणे खालीलप्रमाणे आहेत:-
१) वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे.
२) दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवल्यामुळे.
३) योग्य तो अंदाज न घेतल्यामुळे.
४) चुकीच्या पद्धतीने पुढील वाहनांला ओलांडून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे.
५) यांत्रिकी दोषामुळे.
६) वाहन पाठीमागे घेताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे.
७) योग्य तो इशारा न दिल्यामुळे.
८) योग्य तो सावधगिरी न घेतल्यामुळे.
९) मद्यपान करून वाहन चालविल्यामुळे.
१०) दुस-या वाहन चालकाच्या चुकीमुळे.
११) प्रवाशाने चालत्या गाडीत चढण्याचा/उतरण्याचा प्रयत्न केल्यामुळे.
१२) सायकलस्वाराच्या चुकीमुळे.
१३) पादचा-याच्या चुकीमुळे.
१४) प्रवाशाच्या चुकीमुळे.
राज्य परिवहन गाड्यांना होणारे अपघात टाळण्याच्या उद्देशाने महामंडळाने जे अनेकविध प्रतिबंधक उपाय योजिले आहेत त्यांची माहिती पुढीलप्रमाणे :
१) चालकांच्या जागेसाठी निवड करतांना त्यांच्या किमान दर्जा संबंधी नियम केले असून त्याचे कटाक्षाने पालन केले जाते.
२) चालकांना उतारू वाहन चालविण्यास देण्यापूर्वी आठ आठवड्यांचे अभिक्रम प्रशिक्षण देण्यात येते.
३) चालकांना प्रशिक्षण देणारे वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) त्यांच्या कामात वाकबगार आहेत. मध्यवर्ती कार्यालयाने तयार केलेल्या सुरक्षित वाहतुकीबाबतची नियमावली विषद करून सांगण्याचे व प्रात्यक्षिक करून दाखण्याचे काम हे वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) करतात. चालकांच्या अखत्यारीत असलेली दुरूस्ती कशी करावी हे चालकांना समजावून सांगण्यात येते. त्यांना याबाबत तांत्रिक शिक्षण देण्यात येते व त्यांची चांचणीही घेण्यात येते.
४) वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षक) यांना प्रशिक्षण देण्याबाबत महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत कार्यक्रम हाती घेण्यात येतात. चालकांना प्रशिक्षण देण्याचे काम ज्यांच्याकडे सोपवावयाचे त्या वाहतूक निरीक्षकांची निवड करतांना त्यांचे वय, स्वभाविक कल, अनुभव या गोष्टी विचारात घेण्यात येतात.
५) चालक प्रशिक्षणासाठी एका वेळी १५ चालकांच्या तुकडीला प्रशिक्षण देण्यात येते.
६) महामंडळाच्या चालकांना ज्या प्रकारच्या वाहनांवर काम करावे लागेल, त्या प्रकारच्या वाहनांवर प्रशिक्षण देण्यात यावे.
७) सुरक्षित व उत्तम त-हेने गाडी चालविण्या विषयीचे बोधपट चालकांना वेळोवेळी दाखविण्यात येतात.
८) सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध विषयांवर विस्तृत सूचना देण्यात आल्या आहेत.
९) प्रवाशांची सुरक्षितता वृधिंगत होण्यासाठी आणि अपघात प्रतिबंध यादृष्टीने सुरक्षितता मोहीम ठराविक कालावधीत आयोजित केल्या जातात.
दिनांक १/१/२००६ ते १०/१/२००६ या कालावधीत सुरक्षितता मोहीम पाळण्यात आली होती.
१०) महामंडळाने चालकांसाठी सुरक्षितपणे वाहन चालविण्याबाबत सुचनांची सुधारीत पुस्तिका तयार करून त्याची प्रत प्रत्येक चालकास देण्यात आली आहे.
११) चालकांच्या वाहन चालविण्याच्या सवयीवर वाहतूक पर्यवेक्षकीय कर्मचा-यांनी/अधिका-यांनी लक्ष ठेवण्याबाबत सुचना कार्यान्वित आहेत.
१२) अपघात निरीक्षण नियमावली तयार करण्यात आलेली आहे. सर्व अपघातांची चौकशी केली जाते व त्यातील निष्कर्षानुसार अपघातांची पुनरावृत्ती होऊ नेय म्हणून खबरदारीचे उपाय योजण्यात येतात.
१३) अपघात प्रतिबंध कार्यवाहीसाठी सर्व अपघातांचे वर्गीकरण करून नोंद घेण्यात येते.
१४) चालकांच्या नियुक्तीच्या तारखेपासून वयाची ४० वर्षे होईपर्यंत प्रत्येक २ वर्षाचा कालावधी संपल्यावर दृष्टी तिक्ष्णतेची तपासणी आणि ४० वर्षापेक्षा अधिक वय झालेल्या चालकांची प्रत्येक वर्षी दृष्टी तिक्ष्णतेची तपासणी करण्यात येते.
१५) चालकाने गाडी तपासून ताब्यात घेतांना काही दोष आढळून आल्यास ते संपूर्ण दुरूस्त झाल्याखेरीज गाडी मार्गावर पाठविण्यात येत नाही.
आगारातून गाडी बाहेर पाडण्यापुर्वी व परतल्यावर काही दोष असल्यास ते दुरूस्त करून घेण्यच्या दृष्टीने गाडी तपासण्याची पद्धत अनुसरली जाते.
१६) मार्गावरील गाडीची स्थिती समाधानकारक असावी तसेच वाहतूकीच्या नियमांचे कसोशीने पालन होते किंवा नाही हे पाहण्यात येते.
१७) वेळापत्रके अशा रितीने तयार केली आहेत की, कोणत्याही चालकाला कधीही वेग मर्यादेपेक्षा अधिक व जलद वेगाने गाडी चालविण्याची जरूरी नाही. रस्त्याची परिस्थिती, वाहतूकीचे प्रमाण यावरून दोन ठिकाणांमधील अंतर कापण्याची वेळ ठरविली जाते.
१८) दैनिक व दशदिन वाहन देखभाली व्यतिरिक्त राज्य परिवहन गाड्यांची देखभाल आगार व विभागीय कार्यशाळेत खालील नियमांप्रमाणे करण्यात येते.
अ. पहिले डॉकिंग आगार कार्यशाळा - २ महिने पूर्ण झाल्यावर.
ब. दुसरे डॉकिंग आगार कार्यशाळा - ४ महिने पूर्ण झाल्यावर.
क. तिसरे डॉकिंग विभागीय कार्यशाळा - ६ महिने पूर्ण झाल्यावर.
ड. चौथे डॉकिंग आगार कार्यशाळा - ८ महिने पूर्ण झाल्यावर.
प. पाचवे डॉकिंग आगार कार्यशाळा - १० महिने पूर्ण झाल्यावर.
फ. आरटीओ पासींग विभागीय कार्यशाळा - १ वर्ष पूर्ण झाल्यावर.
१९) गाड्यांचा देखभालीचा कार्यक्रम अंमलात आणण्याकडे विशेष कटाक्ष आहे. देखभालीचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष देण्यात येते.
२०) सुरक्षिततेसाठी वाहनाची देखभाल कशाप्रकारे करावी यावर विशेष भर देण्यात येतो.
२१) बसस्थानकावरील सर्व वाहतूक कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत की, कामावर असलेल्या व कामावर रूजू होणारा चालक मद्यपान केलेला किंवा अंमली पदार्थाचे सेवन केलेले नाही याची खात्री करून नंतरच त्यास गाडी चालवू द्यावी. चालकाने मद्यपान केलेले असल्यास वाहकास गाडी थांबविण्याबद्दल सूचना आहेत. ड्युटीवरील चालक मद्यपान केलेला अथवा अंमली पदार्थांचे सेवन केलेला आढळल्यास असे कृत्य गैरवर्तणुकीच्या सदरात अंतर्भूत केले जाते व सक्त शिक्षा म्हणून कामावरून कमी करण्यापर्यंतची शिक्षा करण्याची तरतुद करण्यात आली आहे.
२२) कामावर हजर असतांना चालक नशेत आढळल्यास त्यास त्वरित कमगिरीवरून उतरवून आगार व्यवस्थापक किंवा सुरक्षा व दक्षता अधिकारी यांच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी देण्यात येते.
२३) सर्व आगारांमध्ये आणि सुरक्षा व दक्षता अधिका-यांना चालकाची अल्कोटेस्ट घेण्यासाठी खास उपकरणे पुरविण्यात आली आहेत. चालकांची अल्कोटेस्ट शासकीय दवाखान्यात घेण्याबाबतही सुचना कार्यान्वित आहेत.
२४) ज्याठिकाणी अपघात होण्याचा संभव आहे व तसेच राज्य परिवहन गाड्यांची जास्त रहदारी आहे अशा घाट परिसरात राज्य परिवहन गाड्यांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास कार्यान्वित राहतील अशी तपासणी केंद्रे उघडण्यात आली आहेत. थळ घाट (कासार), कशेडी घाट (महाड बाजूला), बोर घाट (खंडाळा), खंबाटकी घाट (सातारा) येथील सुरक्षितता तपासणी केंद्र दिनांक ९/२/१९८६ पासून सुरू करण्यात आली होती. बोर घाट (खंडाळा), व खंबाटकी घाट (सातारा) येथील वाहतूक टनेल मधुन सुरू झाल्याने तेथील तपासणी केंद्रे बंद करण्यात आली आहेत.
२५) राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व तसेच इतर हमरस्त्यावर देखरेख करण्याविषयी सूचना कार्यान्वित आहेत. मार्ग देखरेख कार्यक्रमात प्रत्येक अधिका-याचा समावेश असतो. ही देखरेख वेगवेगळया मार्गावर निरनिराळ्या अधिका-यांद्वारे करण्यात येते.
२६) प्रादेशिक व विभागीय कचेरीतील अधिकरी ज्या वेळेस आगारात तपासणी भेटी देतांत त्यावेळी चालक, वाहक व इतर कर्मचारी यांच्या बैठका आयोजित करण्यात येतात. या बैठकीमध्ये महामंडळाने अपघात सुरक्षिततेविषयी जे नियम केले आहेत त्यांची चर्चा करण्यात येते, जेणे करून सर्व कर्मचा-यांच्या मनामध्ये सुरक्षिततेचे महत्व बिंबविले जाते.
२७) चालक, वाहक व बस स्थानक प्रमुख यांना अशा सुचना दिल्या आहेत की, कोणीही व्यक्ती राज्य परिवहन वाहनातून स्फोटक/ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणार नाही याबाबत सदैव दक्षता बाळगावी.
२८) रातराणी/लांब पल्ल्याच्या गाड्यांवर चालकांची नियुक्ती करण्यासाठी विशेष निकष लावले जातात.
२९) राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसेसचा वेग ज्यास्तीत जास्त ६० कि.मी. पर्यंत जाईल यासाठी बसेसचा वेग त्यादृष्टीने मर्यादीत करण्यात आला आहे.
|
| |
|