|
|
| |
| नागरिक सनद - प्रकरण-14 |
| |
प्रवास भाडे परतावा - नियम व कार्यपध्दती
रा.प.महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवास भाडयापोटी अदा केलेल्या रकमेपैकी काही रकमेचा परतावा प्रवाशांना अनेक विध कारणांमुळे देणे आवश्यक असते. उदा. मार्गस्थ बिघाडामुळे बस प्रवास मार्ग पूर्ण करु न शकणे, सुट्टे पैसे नसल्यामुळे प्रवास भाडयापेक्षा जादा रक्कम अदा करणे इत्यादी कारणांमुळे प्रवाशांना परतावा देण्याचे प्रसंग निर्माण होतात. प्रवासी परताव्या संदर्भात पुढीलप्रमाणे कार्यपध्दती आहे.
(1) प्रवाशांकडून प्रवास भाडयापेक्षा जादा पैसे घेतल्यास परतावा करणेबाबत:
प्रवासी सुट्टया पैशांअभावी प्रवास भाडयापेक्षा जास्त पैसे वाहकास देत असतात. अशा प्रसंगी सुट्टे पैसे तात्काळ प्रवाशास परत करणे वाहकास शक्य नसल्यास वाहक प्रवास भाडयापेक्षा जादा जमा झालेली / परतावा करावयाची रक्कम प्रवाशांच्या तिकिटांच्या मागे नोंद करुन स्वाक्षरी करतात. संबंधित प्रवाशाने तिकिटाच्या मागे नोंद केलेली रक्कम अचूक असल्याबाबत व्यक्तीश: खात्री करणे आवश्यक आहे. नोंदविलेल्या रकमेचा परतावा मिळण्यासाठी प्रवाशाने आगार प्रमुखास प्रवास करीत असलेल्या गाडीचा क्रमांक, दिनांक व वेळ नोंदवून व त्यासमवेत प्रवासाची तिकिटे जोडून परतावा मिळण्याबाबतचा अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा विहित नमुना नसून तो साध्या प्रकारे केला जाऊ शकतो. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित आगार प्रमुख अर्जासमवेत जोडलेली तिकिटे व इतर तपशील यांची पडताळणी करतात व सदरची तिकिटे नमूदकेलेल्या मार्गावर विक्री झालेली आहेत आणि अधिकृत तिकिटे असल्याची खात्री करुन परतावा देण्याची कार्यवाही करतात. प्रवाशांनी शक्यतो असा परतावा एक महिन्याच्या कालावधीत मागणी करणे आवश्यक आहे.
(2) आगाऊ आरक्षण तिकीट परतावा:
महामंडळाने प्रवासाची रक्कम आगाऊ भरुन तिकिटे देण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे महामंडळाची नियत बस रद्द झाली तर संपूर्ण रक्कम (आरक्षण आकारासह ) संबंधित प्रवाशास परत करण्यात येते. सदर रक्कम त्वरित परत करण्यात येते.
(3) मार्गात बस बंद पडल्यास द्यावयाचा परतावा:
काही प्रसंगी महामंडळाच्या बसेस मार्गात यांत्रिकी कारणांमुळे बिघाड होऊन बंद पडल्यास प्रवाशांना पुढे प्रवास करणे सोयीचे होत नाही. अशा वेळी प्रवाशांना न झालेल्या प्रवासाच्या प्रवास भाडयाची रक्कम परताव्यापोटी देण्यात येते. तथापि, याकरिता पुढील नियम विचारात घेणे आवश्यक आहे. प्रवाशांची पर्यायी बसने व्यवस्था न झाल्यास, बदली गाडी उपलब्ध न झाल्यास व नैसर्गिक आपत्तीमुळे बस पुढे न जाऊ शकल्यासच परतावा देण्यात येतो. या प्रसंगी वाहक प्रवाशांची तिकिटे परत घेऊन प्रत्येक प्रवाशास तात्काळ परतावा देतो.
(4)उच्चत्तम सेवेची बस रद्द झाल्यास द्यावयाचा परतावा:
काही प्रसंगी वातानुकूलित, निमआराम, आराम बसेस मार्गस्थ बंद पडल्यास अथवा अशा बसेस नियोजित मार्गावर न चालविल्यास, अशा बस सेवांचे आगाऊ आरक्षण केलेले तिकीटधारक प्रवासी अथवा या बसेसमधून प्रवास करणारे प्रवासी यांना साध्या बसेसद्वारे / निम्नत्तम सेवेद्वारे प्रवास करावा लागतो. अशा प्रसंगी प्रवास भाडे फरकाची रक्कम प्रवाशांना परताव्यापोटी त्वरित वाहकाकडून अदा करण्यात येते.
(5)सामानाचा जादा आकार वसूल केल्यास द्यावयाचा परतावा:
काही प्रसंगी प्रवाशांच्या सामानाचे वजन न करता वाहक अंदाजाने सामानाचा आकार प्रवाशांकडून वसूल करतो. परंतु, बसस्थानकावर सदर सामानाचे वाहकासमोर पुन्हा वजन केले आणि घेतलेला आकार हा वाहकाने जास्त घेतला आहे, असे सिध्द झाल्यास वसूल केलेल्या जादा रकमेचा परतावा प्रवाशांना मिळू शकतो. अशा वेळी संबंधित प्रवाशाने स्थानक प्रमुखाकडे अर्ज करुन परताव्याची रक्कम प्राप्त करुन घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे, पुर्नवजन करताना स्थानक प्रमुख यांची उपस्थिती आवश्यक आहे.
(6)हरवलेल्या तिकिटाचा परतावा:
काही प्रसंगी प्रवाशाने घेतलेले आगाऊ आरक्षण तिकीट गहाळ होते आणि प्रवासाच्या वेळी सदर तिकीट दाखविता येत नाही, अशा प्रसंगी ज्या आसन क्रमांकाचे तिकीट असेल त्या आसन क्रमांकावर नवीन तिकीट काढून प्रवास करता येईल. तथापि, गहाळ तिकीट नंतर मिळाल्यास प्रवास तारखेपासून एक महिन्याच्या आत संबंधित प्रवाशाने हरवलेले तिकीट व नवीन घेतलेले तिकीट जोडून विभाग नियंत्रक यांचेकडे अर्ज करावा. अशा अर्जाचा उचित खातरजमा करुन तिकीट रकमेच्या 25% रक्कम कपात करुन परतावा प्रवाशास मिळू शकतो. मात्र, हरवलेल्या तिकिटाचे मूल्य रु.10/- पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. प्रवाशाचे आगाऊ आरक्षण तिकीट हरवलेले / चोरीला गेलेले असल्यास व चोरी / हरविल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदविलेली असल्यास आणि तिकिटाचा परतावा कोणीही मागीतलेला नसेल अशा प्रकरणीसुध्दा वर नमूद केल्याप्रमाणे प्रवाशास परतावा मिळतो.
रा.प.बस अपघातात अपघातग्रस्त झालेल्या प्रवाशांची महामंडळाकडून घेण्यात येणारी दखल व त्यांना देण्यात येणारी नुकसानभरपाई
महामंडळाच्या 15000 पेक्षा जादा बसेसद्वारे दैनंदिन 48 लाख कि.मी. वाहतूक होत आहे. सदर वाहतूक दैनंदिन 15000 पेक्षा अधिक चालकांद्वारे होत आहे. महामंडळाची सेवा अत्यंत सुरक्षित राहील व प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी विनाअपघात वाहून नेण्याची सेवा पुरविणे यास महामंडळाने सर्वोच्च प्राधान्य देऊन महामंडळाच्या चालनीय कामकाजाची दिशा निश्चित केलेली आहे. महामंडळाने प्रवाशांना / समाजास सुरक्षित प्रवासी वाहतूक पुरविण्याचे व्रत स्वीकारले असून याकरिता महामंडळाने स्वतंत्र यंत्रणा / कार्यपध्दती निश्चित केलेली आहे. तरीसुध्दा, महामंडळाच्या चालनाची व्याप्ती व विस्तार विचारात घेता, दुदै्रवाने रा.प.बसेसचे अपघात होत असतात.
रा.प.बसेसना दुदै्रवाने अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त प्रवासी व इतर सर्व संबंधितांना मानवतेच्या जाणीवेतून जास्तीत जास्त मदत देण्याचे धोरण महामंडळाने अंगीकारलेले आहे. अपघातग्रस्त प्रवासी व इतर यांना महामंडळाकडून देण्यात येणारी मदत / नुकसान भरपाई ही देशातील सर्वोकृष्ट असून इतर महामंडळे व वाहतूक संस्था यांना दिशादर्शक आहे.
रा.प.बसला अपघात झाल्यानंतर सदर बसच्या कर्तव्यावरील चालक / वाहक हे संबंधित अपघाताची माहिती त्वरित नजिकचे बसस्थानक, पोलीस स्टेशन यांचेकडे देतात. काही प्रसंगी अशा अपघातांची माहिती बसमधील प्रवासी अथवा अन्य माध्यमाद्वारे प्राप्त होते. रा.प.अपघाताची माहिती प्राप्त होताच, नजिकच्या आगारातील सर्व संबंधित पर्यवेक्षक / अधिकारी हे तात्काळ, कालापव्यय न करता अपघातस्थळी उचित साधनसामुग्रीसह दाखल होऊन पुढील मदतकार्य, व इतर कार्यवाही करतात.
अपघातग्रस्त प्रवासी व इतर सर्व संबंधित यांना नजिकचे शासकीय रुग्णालय, कुटीर, म्युनिसिपल, जिल्हापरिषद दवाखाना या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय उपचारासाठी दाखल करतात. तद्नंतर, वैद्यकीय सल्ल्यानुसार एका दवाखान्यातून दुसऱ्या दवाखान्यात जेथे चांगली वैद्यकीय सुविधा आहे, तेथे दाखल करण्यात येते. त्याचप्रमाणे, अपघातग्रस्त प्रवाशांना वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे व दवाखान्यात जेवण, चहा, फराळ इत्यादी महामंडळाकडून पुरविण्यात येते.
तात्कालिक मदत प्रवासी प्रवासात असताना अनेकवेळा प्रवासी आपल्या राहत्या ठिकाणापासून दूर अंतरावर ज्या ठिकाणी त्यांच्या परिचयाचा कोणीही नाही, अशा ठिकाणी असतात व त्यांचेकडे पुरेसे पैसे नसतात. अशा ठिकाणी व अशा वेळी अपघात झाल्यास संबंधित अपघातग्रस्त प्रवाशास तात्काळ आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता असते. हीच बाब विचारात घेऊन महामंडळाकडून अपघातग्रस्त प्रवाशांना पुढीलप्रमाणे आर्थिक तात्कालिक मदत देण्यात येते. सदर आर्थिक तात्कालिक मदत ही जखमी प्रवाशाच्या जखमांचे स्वरुप विचारात घेऊन देण्यात येते.
(अ) किरकोळ स्वरुपाची दुखापत झालेली असल्यास रु.100/- ते रु200/-.
(ब) गंभीर स्वरुपाची दुखापत झालेली असल्यास रु.500/-.
(क) मृत प्रवासी, पादचारी, सायकलस्वार यांचे नातेवाईकास रु.5000/-.
उपरोक्त तात्कालिक मदत रा.प. बससमवेत इतर स्वयंचलित वाहन अपघाग्रस्त असल्यास इतर स्वयंचलित वाहनातील व्यक्तींना देण्यात येत नाही. त्याचप्रमाणे, सदर आर्थिक तात्कालिक मदत ही अंतिम नुकसान भरपाईची रक्कम नसून या मदतीचा प्रवाशांच्या नुकसान भरपाई मागण्याच्या हक्कावर कोणतीही बाधा येत नाही. अपघातग्रस्त प्रवासी व इतर यांना वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर अथवा मृत प्रवासी व्यक्तीच्या नातेवाईकास वर नमूद केलेली तात्काळ मदत अदा केल्यावर त्यासमवेत त्यांना एक अर्ज ''पी फॉर्म'' देण्यात येतो. सदरचा अर्ज हा अपघातग्रस्त प्रवासी अथवा मृत व्यक्तीचा वारस यांना नुकसान भरपाईपोटी मागणी करावयाची रक्कम या संदर्भात असतो. अपघातग्रस्तांनी वैद्यकीय उपचार व इतर बाबी पूर्ण झाल्यावर सदरच्या अर्जातीत तपशील नोंदवून व आवश्यक ती कागदपत्रे जोडून संबंधिताने नुकसान भरपाईची मागणी ज्या विभागाची बस असेल त्या विभाग नियंत्रकाकडे करावयाची आहे. अर्जासमवेत प्राप्त झालेला तपशील, जखमांचे स्वरुप, अर्जदारास झालेला वैद्यकीय खर्च, त्याची सत्यता व अपघातग्रस्ताचे झालेले इतर नुकसान, अपघातातील महामंडळाचे कायदेशीर उत्तरदायीत्व, अपघातग्रस्ताची अर्थार्जनाची क्षमता, लिंग, वय व अपघातग्रस्त व्यक्तीवर अवलंबित असलेल्या व्यक्ती हे सर्व घटक विचारात घेऊन पुढील नमूद केलेले सक्षम प्राधिकारी प्रकरणपरत्वे नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करतात.
अपघात नुकसान भरपाई
सक्षम प्राधिकारी - विभाग नियंत्रक
1. प्रवासी
| अ.क्र. |
जखमांचे स्वरुप |
नुकसान भरपाईची रक्कम |
| 1 |
मृत व्यक्ती |
रु.1,00,000/- |
| 2 |
कायमस्वरुपाची विकलांगता |
रु.75,000/- पर्यंत |
| 3 |
कायमस्वरुपाची अंशत: विकलांगता |
रु.50,000/- पर्यंत |
| 4 |
तात्पुरती विकलांगता |
रु.40,000/- पर्यंत |
2.पादचारी, सायकलस्वार, प्रवासी आणि त्रयस्थ वाहनातील व्यक्ती यांना ( अपघातास रा.प.चालक जबाबदार असेल तर )
| अ.क्र. |
जखमांचे स्वरुप |
नुकसान भरपाईची रक्कम |
| 1 |
मृत व्यक्ती |
रु.1,00,000/- |
| 2 |
कायमस्वरुपाची विकलांगता |
रु.50,000/- पर्यंत |
| 3 |
तात्पुरती विकलांगता |
रु.40,000/- पर्यंत |
| 4 |
अस्थीर मालमत्तेचे नुकसान |
रु.40,000/- (नुकसानीच्या प्रमाणात ) |
3.पादचारी, सायकलस्वार, प्रवासी आणि त्रयस्थ वाहनातील व्यक्ती यांना ( अपघातास रा.प.चालक जबाबदार नसेल तर )
1. मृत व्यक्ती - रु.50,000/-
2. कायमस्वरुपी विकलांगता - रु.25,000/-
3. अस्थीर मालमत्तेचे नुकसान - रु.6,000/-
4. त्रयस्थ/ वाहनांतील व्यक्ती
1. मृत व्यक्ती - रु.25,000/-
2. कायमस्वरुपी विकलांगता - रु.12,500/-
उपरोक्तप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येते. तथापि, विवादात्मक प्रकरणी अपघाग्रस्तांना नुकसान भरपाई प्रकरणे तपासून गठीत केलेल्या समितीने शिफारस केलेली अपघात नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करणारे सक्षम प्राधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.
| अ.क्र. |
सक्षम प्राधिकारी |
नुकसान भरपाई रक्कम |
| 1 |
विभाग नियंत्रक |
रु.1.50 लाखापर्यंत |
| 2 |
व्यवस्थापकीय संचालक |
रु.1.50 ते रु.2.00 लाखापर्यंत |
| 3 |
उपाध्यक्ष |
रु.2.00 ते रु.2.50 लाखापर्यंत |
| 4 |
अध्यक्ष |
रु.2.50 ते रु.3.00 लाखापर्यंत |
| 5 |
स्थायी समिती / महामंडळ |
रु.3.00 लाखाच्या वर |
अपघातग्रस्त जखमी व्यक्तींना दिलेली तात्काळ आर्थिक मदत अंतिम नुकसान भरपाईच्या रकमेतून वळती करण्यात येत नाही. तथापि, मृत व्यक्तींच्या नातेवाईकास दिलेली तात्कालिक आर्थिक मदत ही अंतिम नुकसान भरपाईच्या रकमेतून वसूल करण्यात येते.
क्षतिपूर्तीबंधपत्र - वारसाहक्कपत्र मिळविण्यात अनेक अडचणी, समस्या निर्माण होतात. परिणामी वारसा हक्कपत्रा अभावी मृत व्यक्तीच्या वारसास नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त करण्यास विलंब होऊ नये याकरिता महामंडळाने क्षतिपूर्तीबंधपत्राच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्याची सुविधा निर्माण केलेली आहे. या अंतर्गत मृताची पत्नी अथवा पती, मृत मुलाचे वडील अथवा जेष्ठ मुलगा/मुलगी यांना ते रहात असलेल्या गांवचा सरपंच अथवा पोलीस पाटलाचे किंवा राजपत्रित अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र घेऊन स्टॅम्प पेपरवर क्षतिपूर्तीबंधपत्र ( इन्डेम्नीटी बॉन्ड ) सादर करुन नुकसान भरपाई अदा करण्याची सोय आहे. सदर शिफारस पत्रात संबंधित मागणीकर्ता हा त्यांच्या परिचयाचा असून फक्त सदर इसमच संदर्भित नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे, असे नमूद करणे आवश्यक आहे.
वरीलप्रमाणे, अपघातग्रस्त व्यक्तींना तात्काळ व अंतिम नुकसान भरपाई देण्याची स्वतंत्र कार्यपध्दती महामंडळाने निर्माण केलेली आहे. त्याचप्रमाणे, जखमी प्रवाशांना त्यांचे घरी जाण्यासाठी मोफत प्रवास पास देणे, नातेवाईकांना कळविणे व त्यांना पास देणे, मृत प्रवाशाचा मृतदेह, त्याचे राहत्या ठिकाणी पोहचविणे इत्यादी कर्तव्ये महामंडळाकडून पार पाडण्यात येतात. अन्य कोणतीही वाहतूक संस्था अथवा खाजगी वाहतूकदारांकडून अशा प्रकारे अपघाग्रस्तांना आर्थिक तात्कालिक मदत अथवा नुकसान भरपाई देण्यात येत नाही. केवळ सामाजिक बांधिलकी व मानवता या हेतूनेच महामंडळाकडून सदर नुकसान भरपाई अदा करण्याची कार्यपध्दती निर्माण करण्यात आलेली आहे.
न्यायालयीन नुकसान भरपाई प्रकरणे - उपरोक्तप्रमाणे महामंडळाने नुकसान भरपाईची कार्यपध्दती निश्चित केलेली असली तरीसुध्दा प्रवासी थेट न्यायालयाद्वारे नुकसान भरपाईची मागणी करु शकतो किंवा महामंडळाने देऊ केलेली नुकसान भरपाईची रक्कम अपुरी वाटत असेल तरीसुध्दा संबंधित प्रवासी / नातेवाईक न्यायालयाद्वारे नुकसान भरपाईची मागणी करु शकतो.
लोक न्यायालय - रा.प.बसेसमधील अपघातग्रस्त व्यक्तींनी न्यायालयाद्वारे नुकसान भरपाईची मागणी केली असल्यास अशा प्रकरणी विलंब होऊन नुकसानभरपाई वेळीच मिळत नाही. संबंधितांना विलंबामुळे होणाऱ्या त्रासातून मुक्तता मिळावी या हेतूने सदर नुकसान भरपाईची प्रकरणे लोक न्यायालयाद्वारे निकाली काढण्याच्या कार्यपध्दतीस महामंडळाने सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. ज्या अपघात प्रकरणी रा.प.चालक अपघातास पूर्णपणे जबाबदार असेल अशी प्रकरणे लोक न्यायालयात तडजोडीने निकाली काढण्यात यावीत.
सुरक्षित प्रवासी वाहतूक उपाययोजना - माल वाहतूक व प्रवासी वाहतूक यामध्ये मुलभूत फरक असून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास अपघात झाल्यास मनुष्य जीवाची अपरिमित, कधीही भरुन न येणारी जिवीत व आर्थिक हानी होत असते. ही बाब विचारात घेता, प्रवासी वाहतूक व्यवसायात सुरक्षित प्रवासी वाहतूक यास प्रथम प्राधान्य देण्यात येते. यास अनुसरुन महामंडळानेसुध्दा सुरक्षित प्रवासी वाहतूक या ब्रिद वाक्यास केंद्रीभूत ठेऊन चालनीय धोरण निश्चित केलेले असून त्यानुसार अनेकविध उपाययोजना अंमलात आणलेल्या आहेत. याअंतर्गत चालक भरतीची प्रक्रिया काटेकोरपणे करणे, चालकांना वेळोवेळी देणे, सुरक्षित सेवा अभियान राबविणे, विनाअपघात चालकांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरविणे, तांत्रिकदृष्टया सक्षम वाहन मार्गावर राहील याबाबत कार्यवाही करणे व सुरक्षित वाहतूक होईल अशी वेळापत्रकाची आखणी करणे इत्यादी उपाययोजना अंमलात आणलेल्या आहेत.
1. चालकांची निवड रा.प.महामंडळामध्ये चालकाची निवड करताना शास्त्रीय पध्दत अवलंबिलेली असून चालकांच्या पात्रतेचे कठीण निकष निश्चित करण्यात आलेले आहेत. जेणेकरुन अवजड वाहन चालविण्याचा दीर्घ अनुभव व शारीरिकदृष्टया सक्षम चालकांची निवड होऊन सुरक्षित प्रवासी वाहतूक होईल, याची दक्षता महामंडळाकडून प्राथमिक टप्प्यातच घेण्यात येते. निवड करण्यात आलेल्या चालकांना प्रत्यक्ष कामगिरी देण्यापूर्वी 8 आठवडयाचे अभिक्रम प्रशिक्षण देण्यात येते.
2. चालकांना प्रशिक्षण देणारा प्रशिक्षित पर्यवेक्षीय कर्मचारी रा.प.महामंडळात सुमारे 38000 चालक कार्यरत आहेत. या चालकांना सुरक्षित वाहन चालविण्याबाबतचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. ही बाब विचारात घेऊन महामंडळाने चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्था, विभागीय प्रशिक्षण केंद्रे निर्माण करुन प्रशिक्षित प्रशिक्षकांची नियुक्ती केलेली आहे. या अंतर्गत सहाय्यक वाहतूक अधीक्षक वा वाहतूक निरीक्षक यांचेमार्फत चालकांना प्रशिक्षण देण्याची स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेली आहे. सदर प्रशिक्षक चालकांना त्यांच्या अखत्यारित असलेले वाहन सुस्थितीत ठेवणे, त्याची निगा ठेवणे, त्यामध्ये किरकोळ दोष आढळल्यास त्याची दुरुस्ती करणे इत्यादी प्रशिक्षण देतात. सुरक्षित व उत्तमरीत्या वाहन चालविण्याबाबतचे बोधपट /चित्रफित चालकांना दाखवून त्याविषयी माहिती देतात. त्याचप्रमाणे सुरक्षित वाहन चालविण्याबाबतच्या सूचनांचा समावेश असलेली स्वतंत्र पुस्तिका महामंडळाकडून तयार करण्यांत आलेली असून ही पुस्तिका सर्व चालकांना देण्यांत आली आहे.
3.चालकांचे प्रशिक्षण
(अ) अभिक्रम प्रशिक्षण :- चालकांची नियुक्ती कसोशीने व्हावी याकरिता उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यांत येऊन त्यांच्या वाहन चालविण्याच्या क्षमतेची प्राथमिक चाचणी घेण्यांत येते. या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत / चाचणी प्रादेशिक छाननी समितीमार्फत घेण्यांत येऊन या समितीने निवड केलेल्या उमेदवारांची / चालकाची शारीरिकदृष्टया वैद्यकीय तपासणी करण्यांत येते. तद्नंतर उत्तीर्ण चालकांचा आठ आठवडयांचा अभिक्रम प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यांत येतो. हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर अंतीम चाचणी घेण्यांत येऊनच रोजंदार म्हणून चालकांची नियुक्ती करण्यांत येते.
(ब) उजळणी प्रशिक्षण :- ज्या चालकांची 10 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी सेवा महामंडळात झाली असेल अशा चालकांना दोन वर्षातून एकदा प्रशिक्षण देण्यांत येते. तर ज्या चालकांची 10वर्षांपेक्षा जास्त सेवा महामंडळात झाली असेल अशा चालकांना पाच वर्षांतून एकदा प्रशिक्षण देण्यांत येते. सदर प्रशिक्षण कार्यक्रम हा प्रत्यक्ष वाहन चालविण्याच्या सुधारणेवर आधारित असतो. या प्रशिक्षणामध्ये चालकांचे दोष व वाहन चालविताना त्यांच्या असलेल्या वाईट सवयी चालकांच्या नजरेस आणून देऊन सुधारात्मक प्रशिक्षण देण्यात येते.
(क) अपघात प्रवण पाठयक्रम प्रशिक्षण प्राणांतिक अपघात करणाऱ्या चालकास कामगिरीवरुन उतरवून घेऊन त्यास 10 दिवसांचे अपघात प्रवण पाठयक्रम प्रशिक्षण देण्यात येते. चालकाकडून ज्या दोषामुळे अपघात झाला, तो दोष सुधारण्यासाठी वाहन चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण देण्यात येते.
4. चालकांची वैद्यकीय तपासणी रा.प. महामंडळातील सर्व चालकांची नियुक्तीपासून प्रत्येक दोन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर दृष्टी तीक्ष्णतेची तपासणी करण्यांत येते. सदरची तपासणी चाळीस वर्षे वयोमर्यादेपर्यंत करण्यांत येते. चाळीस वर्षांवरील वयोमर्यादा असलेल्या चालकांची दृष्टी तीक्ष्णतेची तपासणी प्रति वर्षी महामंडळाकडून करण्यांत येते.
5. तांत्रिकदृष्टया सक्षम बसेस मार्गावर राहतील या दृष्टीने करण्यांत आलेली उपाययोजना रा.प. बस मार्गावर चालनात आणण्यापूर्वी सदर बस दोषविरहीत व तांत्रिकदृष्टया सक्षम असल्याची खात्री / तपासणी प्रशिक्षित यांत्रिकी कर्मचा-यांकडून करण्यांत येऊनच सदर बस मार्गावर देण्यासाठी सज्ज ठेवण्यांत येते. त्याचप्रमाणे चालकाने गाडी मार्गावर नेण्यापूर्वी तपासूनच ताब्यांत घ्यावयाची कार्यपध्द्ती आहे आणि अपवादात्मक स्थितीत चालकांस काही दोष वाहनात आढळून आल्यास सदरचे दोष दुरुस्त करुनच वाहन मार्गावर नेण्याची पध्द्त अनुसरली जाते. त्याचप्रमाणे, वाहन दोषविरहीत व यांत्रिकदृष्टया सक्षम राहील या हेतूने महामंडळाकडून बसेस देखभालीचा ठोस प्रतिबंधात्मक स्वतंत्र कार्यक्रम तयार केलेला असून सदर कार्यक्रमाअंतर्गत दैनिक, दशदिन व मासिक देखभाल करण्यांत येते. त्याचप्रमाणे, या अंतर्गत ब्रेक्स, स्टिअरिंग, व्हिल्स, इत्यादि सुरक्षिततेच्यादृष्टीने संवेदनशील असलेल्या यंत्रणेबाबत विशेष सतता बाळगण्यांत येते.
सुरक्षित वाहतुकीकरिता विशेष अंमलात आणलेल्या उपाययोजना - बसस्थानकावरील पर्यवेक्षकीय कर्मचारी हे कर्तव्यावर जाणारे व कामगिरीवर असलेले चालक यांनी अंमली पदार्थाचे सेवन केलेले नाही याची खातरजमा करत असतात. ज्या घाट परिसरात जास्तीत जास्त रा.प.बसेसची वर्दळ आहे, अशा थळ व कशेडीद्न घाट या ठिकाणी 24 तास कार्यान्वित असलेली सुरक्षितता तपासणी केंद्रे सुरु केलेली आहेत. तसेच, राष्ट्रीय, राज्य महामार्ग व इतर हमरस्त्यावर वेळोवेळी गस्त पथके ठेवण्यात येतात. रातराणी / लांब पल्ल्याच्या बसेसवर अनुभवी चालक पाठविण्यात येतात.
सुरक्षित प्रवासी वाहतुकीकरिता विशेष अभियान - रा.प.कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव व्हावी व प्रवाशांमध्येसुध्दा सुरक्षित प्रवासाबद्दल विश्वास वृध्दिंगत व्हावा या हेतूने सुरक्षितता मोहीम दरवर्षी महामंडळाकडून आयोजित करण्यात येते. राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता परिषद, भारत सरकार या परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार मोटार वाहन अपघात सुरक्षिततेची जाणीव सर्वस्तरावर होण्यासाठी संपूर्ण देशभर दरवर्षी जानेवारी महिन्यात सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते. या अंतर्गत दरवर्षी दिनांक 1 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीत महामंडळाकडून सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते.
अपघात टाळण्यासाठी प्रोत्साहन बक्षिस योजना - सलग सहा महिन्याच्या अपघात विरहीत कालावधीसाठी संबंधित आगारास सांघिक कामगिरीबद्दल रु.2500/- चे रोख पारितोषिक देण्यात येते. एक वर्षाच्या कालावधीत सतत 260 दिवस विनाअपघात कामगिरी करणाऱ्या चालकांना रु.500/- तर एक वर्षापेक्षा अधिक परंतु 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत सतत 260 दिवस विनाअपघात कामगिरी करणाऱ्या चालकांना रु.300/- चे रोख पारितोषिक देण्यात येते. ''चालकांना निवडश्रेणी देताना 5 वर्ष विनाअपघात सेवेची अट निर्धारित करण्यात आलेली आहे.''
विनाअपघात सेवा 5, 10, 15, 20, 25 आणि 30 वर्ष जे चालक करतील अशा चालकांना सुरक्षित वाहन चालविल्याबद्दल बिल्ला देण्यात येतो. 25 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघात विरहीत सेवा करणाऱ्या चालकांना प्रत्येकी रु.7000/- रोख व सन्मान पत्र, स्मृती चिन्ह व चालकाच्या धर्मपत्नीस साडी - खण देऊन गौरविण्यात येते. उपरोक्त प्रकारे सुरक्षित प्रवासी वाहतूक व्हावी याकरिता महामंडळाने अनेकविध उपाययोजना अंमलात आणून सुरक्षित वाहतुकीचे व्रत अंगीकारुन त्याचे पालन केलेले आहे. |
| |
|