|
|
| |
| नागरिक सनद - प्रकरण-13 |
| |
प्रवाशाचे गहाळ झालेले व जमा असलेले असे सामान प्रवाशांना परत देण्याची कार्यपध्दती
प्रवाशांना प्रवासादरम्यान सामानासह प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली आहे. प्रवासी स्वत:कडील सामान प्रवास पूर्ण झाल्यानंतरही बसमध्येच विसरतात असा अनुभव आहे. असे प्रवाशांकडून बसमध्ये राहिलेले सामान रा.प.वाहक / कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आल्यास संबंधित कर्मचाऱ्याने सदरचे सामान बसस्थानक प्रमुखाकडे जमा करावे अशा सूचना आहेत. अशा प्रकारे महामंडळाकडे जमा झालेल्या सामानाची नोंद ठेवण्यात येते. सदर गहाळ वस्तू संबंधित प्रवाशाने मागणी केल्यास खातरजमा करुन व सदर गहाळ वस्तु ही मागणी केलेल्या प्रवाशाचीच असल्याची खात्री करुन संबंधितांस परत देण्यात येते.
गहाळ वस्तु परत मिळविण्याकरिता संबंधित प्रवाशाने लेखी अर्ज संबंधित स्थानक प्रमुख / आगार व्यवस्थापक यांचेकडे करणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा विहित नमुना नसून साध्या पध्दतीने हा अर्ज करावयाचा आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित स्थानक प्रमुख हे चौकशी करुन व मागणी केलेले सामान महामंडळाकडे जमा झाले असल्याची खात्री करतात आणि जमा झालेले सामान हे मागणीकर्त्याचेच असल्याची खातरजमा करुन त्यांना परत देण्याची कार्यवाही करतात. सदरचे सामान परत ताब्यात मिळाल्याबाबत मागणीकर्त्याची स्वाक्षरी गहाळ वस्तू नोंदवहीवर घेण्यात येते.
महामंडळाकडे जमा झालेल्या गहाळ वस्तुवर मालकाचे नांव अथवा इतर तपशील नोंदविलेला असल्यास अशी वस्तु 10 दिवसांच्या आत घेऊन जाण्याबाबत संबंधितास महामंडळाकडून लेखी पत्राद्वारे कळविण्यात येते.
गहाळ वस्तु संबंधित प्रवाशाच्या ताब्यात देताना वस्तू महामंडळाकडे जमा राहिल्या प्रित्यर्थ ठराविक दराने आकार वसूल करण्यात येतो. त्यानुसार वस्तुची किंमत रु.100/- पेक्षा कमी असेल तर प्रति दिन प्रति वस्तू 10 पैसे याप्रमाणे जास्तीत जास्त रु.5/- आणि गहाळ वस्तुची किंमत रु.100/-पेक्षा अधिक असेल तर अशा वस्तुपोटी प्रति दिन 50 पैसे प्रमाणे कमाल रु.10/- या दराने आकार वसूल करण्यात येतो. त्याचप्रमाणे गहाळ वस्तु मागणीकर्त्याच्या मागणीनुसार दुसऱ्या गावी पाठवावयाची असल्यास उपरोक्त आकाराशिवाय वाहतुकीचा दर पार्सलच्या दराने आकारण्यात येतो.
नाशिवंत वस्तू गहाळ सामानाअंतर्गत जमा झाल्यास अशी वस्तु खराब होऊ नये याकरिता 24 तासात या वस्तु ताब्यात घेण्याकरिता संबंधित प्रवासी न आल्यास अशा वस्तुंचा लिलाव महामंडळाकडून करण्यात येतो. लिलाव झाल्यानंतर व 7 दिवसांच्या आत संबंधित प्रवाशाने नाशिवंत माल आपलाच असल्याची मागणी करुन तशी खात्री करुन दिल्यास संबंधित वस्तुच्या लिलावाद्वारे महामंडळास प्राप्त झालेल्या रकमेतून मागणीकर्त्या प्रवाशास 10% रक्कम वजावट करुन देण्यात येते. महामंडळाकडे जमा झालेली गहाळ वस्तु सर्वसाधारणपणे एक महिना कालावधीसाठी जमा करुन ठेवण्यात येते. या एक महिन्याच्या कालावधीत जमा झालेल्या वस्तुवर कोणीही हक्क न सागितल्यास सदर वस्तु महामंडळाकडून जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्यात येते.
गहाळ वस्तू अंतर्गत महामंडळाकडे जमा झालेले सामान / माल सरकारी बंधने असलेला असेल अथवा चोरीचे सोने - चांदी इत्यादी प्रकारचे असेल तर असे सामान पोलीस / अबकारी अधिकारी यांचेकडे जमा करण्यात येते. तसेच गहाळ वस्तुचे मूल्य रु.1000/- पेक्षा जास्त असेल तर असे सामान संबंधित विभागात जमा करण्यात येते. सदर सामानाचा परतावा विभागीय कार्यालयाकडूनच करण्यात येतो. |
| |
|