|
|
| |
| नागरिक सनद - प्रकरण-11 |
| |
रा.प.बसस्थानकावरील सामान वाहतुकीची/ हमालीची कार्यपध्दती व दर
प्रवाशांना सामानासह प्रवास करणे आवश्यक आहे. आणि अशा सामानासह प्रवास करणे प्रवासीवर्गास जिकरीचे, कष्टदायक होत असते. प्रवाशांची सामानासह प्रवास करण्याच्या कष्टप्रायस्थितीमध्ये सुधारणा होऊन प्रवास सुखकारक व्हावा या हेतूने रा.प.महामंडळाने बसस्थानके, वाहतूक नियंत्रण केंद्र व इतर महत्वाच्या ठिकाणी प्रवासी सामान बसेसच्या टपावर चढविण्या-उतरविण्याकरिता तसेच बसेसपासून बसस्थानकाबाहेर नेण्या - आणण्यासाठी पुरेशा प्रमाणात भारवाहकांची (हमालांची ) नेमणूक करण्यात आलेली आहे.
सदर भारवाहकाद्वारे प्रवाशांचे सामान वाहून नेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. या सुविधेपोटी प्रवाशांना ठराविक दराने हमालीपोटी रक्कम अदा करावी लागते. सद्यस्थितीत चालनात असलेले हमालीचे दर पुढीलप्रमाणे देण्यात येत आहेत. बसमध्ये सामान चढविणे - उतरविणे याकरिता साधारणपणे 40 कि.ग्रॅम वजनाच्या / डोईभाराच्या सामानाकरिता 0.60 पैसे यादराने हमाली आकारण्यात येते. त्याचप्रमाणे, प्रवाशांच्या सोयीच्या ठिकाणापासून ते बसपर्यंत प्रवासी सामान वाहतुकीपोटी प्रति 40 कि.ग्रॅमचा डाग / डोईभार यासाठी 0.60 पैसे दराने हमाली आकारण्यात येते.
बसस्थानकावरील भारवाहकांना प्रवाशांशी सौजन्यपूर्वक, आदराने वागणूक देण्याबाबत महामंडळाकडून सूचित करण्यात आलेले आहे. या भारवाहकांची वर्तणूक, अवाजवी हमालीचे दर आकारणी करणे, प्रवाशांची अडवणूक करणे, हमालांची उपस्थिती नसणे इत्यादीविषयी तक्रार / सूचना प्रवाशांना नोंदवावयाची असल्यास त्यांना सदरची तक्रार संबंधित बसस्थानकावरील स्थानक प्रमुख यांचेकडे तोंडी / लेखी स्वरुपात नोंदविता येते. नोंदविलेल्या तक्रारीची तात्काळ दखल स्थानक प्रमुख यांचेमार्फत घेण्यात येऊन जागीच तक्रारीचा निपटारा करण्याची कार्यपध्दती आहे. अपवादात्मक स्थितीत तात्काळ निपटारा न झाल्यास बसस्थानकावरील तक्रार व सूचना नोंदवहीत प्रवाशांनी तक्रार नोंदवावी. नोंदविलेल्या तक्रारीची दखल घेण्यात येऊन करण्यात आलेली कार्यवाही तक्रारकर्त्यास संबंधित बसस्थानक प्रमुख / आगार प्रमुख यांचेकडून लेखीस्वरुपात कळविण्यात येते. |
| |
|