प्रस्तावना
रस्ते प्रवासी वाहतूक या व्यवसायाचे
नागरिक जीवनमानाशी असलेले अतूट नाते
लक्षात घेऊन राष्ट्राचा / नागरिकांचा
सर्वांगिण उत्कर्ष व्हावा या हेतूने
केंद्र शासनाने रस्ते परिवहन महामंडळ कायदा,
1950 पारित करुन रस्ते प्रवासी वाहतूक
व्यवसायाकरिता प्रत्येक राज्यात एक
स्वतंत्र रस्ते प्रवासी महामंडळ
कार्यान्वित करण्याची तरतूद केलेली आहे.
त्यास अनुसरुन राज्यातील नागरिकांकरिता
सुसूत्र, किफायतशीर, गतीमान व कार्यक्षम
रस्ते प्रवासी वाहतूक सेवेचे जाळे निर्माण
व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाने
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची
निर्मिती केलेली आहे. राज्याच्या आर्थिक,
सामाजिक विकासाकरिता रस्ते प्रवासी
वाहतुकीचे असलेले महत्व विचारात घेऊन
राज्य शासनाने राज्यातील रस्ते प्रवासी
वाहतुकीबाबत पुरोगामी / विकसनशील
धोरणात्मक निर्णय घेऊन सन 1974 मध्ये
राज्यातील रस्ते प्रवासी वाहतुकीची
राष्ट्रीयीकरणाची योजना पूर्ण करुन
राज्यातील रस्ते टप्पा प्रवासी वाहतुकीचे
एकाधिकार एस.टी.महामंडळास प्रदान केलेले
आहेत. परिणामी महामंडळाकडून प्रवाशांकरिता
उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोयी, सुविधा
व सेवा यांची माहिती जनतेस मिळावी हा
नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. तरी,
महामंडळाच्या कार्याबाबतची माहिती जनतेस
मिळावी या हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग
परिवहन महामंडळाने ''नागरिकांची सनद''
प्रकाशित केलेली आहे. यामुळे महाराष्ट्र
राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिक
कार्यक्षम, गतीमान, ग्राहकाभिमूख व
पारदर्शक होण्यास मदत होईल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळाच्या निर्मितीची पार्श्वभूमी
मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी दळणवळणाच्या
सोयीस अनन्य साधारण महत्व असून
औद्योगिकीकरणाच्या कालावधीत वाहतूक सुविधा
ही परवलीची बाब झालेली होती.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील रस्ते
प्रवासी वाहतूक व्यवसाय असंघटीत,
असुरक्षित व कोणतेही नियंत्रण नसलेल्या
स्थितीत सुरु होता. खाजगी
व्यावसायिकांकडून प्रवाशांची सुरक्षितता व
सोयी सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत
होते. नागरिकांकडून परिस्थिती / काळानुरुप
अवाजवी प्रवास भाडे वसूल करुन प्रवाशांची
आर्थिक पिळवणूक करण्यात येत होती.
त्याचप्रमाणे खाजगी व्यावसायिकांकडून
प्रवासी वाहतूक व्यवसायाकरिता आवश्यक त्या
प्रमाणात भांडवलाची उभारणी होत नव्हती.
त्यामुळे राज्याचा / देशाचा विकास
ह्लाुंँठीत झालेला होता. ही स्थिती
राष्ट्राच्या विकासास बाधा आणणारी होती.
या सर्वातून मार्ग काढण्यासाठी केंद्र
सरकारने रस्ते प्रवासी वाहतुकीचा सुसंघटीत
विकास व्हावा याकरिता रस्ते परिवहन
महामंडळ कायदा, 1950 पारित करुन प्रत्येक
राज्यासाठी प्रवासी वाहतुकीकरिता स्वतंत्र
राज्य परिवहन महामंडळाची निर्मिती केली.
या कायद्यातील तरतुदीनुसार राज्यातील
नागरिकांना कार्यक्षम, पुरेशी, समन्वयीत,
सुसूत्रित व किफायतशीर रस्ते प्रवासी
वाहतूक पुरविण्याची प्राथमिक जबाबदारी
राज्य मार्ग परिवहन महामंडळावर टाकण्यात
आलेली आहे. यास अनुसरुन मुंबई राज्यात
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची निर्मिती
सन 1948 मध्ये करण्यात आलेली होती.
राज्याच्या फेर संरचनेनंतर सन 1961 मध्ये
मुंबई राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे
रुपांतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन
महामंडळामध्ये झालेले आहे.
महाराष्ट्र राज्याची भौगोलिक व्याप्ती,
राज्याची लोकसंख्या या सर्व बाबींचा विचार
करता महाराष्ट्र राज्य देशात तिसऱ्या
क्रमांकाचे राज्य आहे. आणि या राज्याचा
गतीमान, सर्वंकष विकास व्हावा याकरिता
प्राथमिक सोयी सुविधा निर्माण करण्याची
नितांत आवश्यकता असल्याने व राज्याच्या
निर्मितीच्या सुरुवातीच्या कालावधीत
राज्यात रस्ते प्रवासी वाहतुकीची सुविधा
पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने राज्य
सरकारने सन 1974 मध्ये राज्यात रस्ते
प्रवासी वाहतूक व्यवसायाच्या
राष्ट्रीयीकरणाची योजना पूर्ण करुन
राज्यातील रस्ते प्रवासी वाहतुकीचे
एकाधिकार कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य
मार्ग परिवहन महामंडळास प्रदान केलेले
आहेत.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने
सन 1948 मध्ये 36 बेडफोर्ड बसेसद्वारे
राज्यातील नागरिकांकरिता प्रवासी सुविधा
उपलब्ध करुन देऊन या सुविधेमध्ये
नागरिकांच्या प्रवासी वाहतूक गरजेनुसार
वेळोवेळी वाढ केलेली आहे व आजमितीस
महामंडळाच्या ताफ्यात 15001 बसेस असून
त्याद्वारे नागरिकांना कार्यक्षम प्रवासी
वाहतूक सुविधा पुरविण्यात येत आहे.
कार्यक्षम वाहतूक सुविधा निर्माण व्हावी
याकरिता मध्यवर्ती कार्यालय, 6 प्रादेशिक
कार्यालये, 30 विभागीय कार्यालये, 3
मध्यवर्ती कार्यशाळा, 247 आगारे, 5
प्रशिक्षण केंद्रे, 9 टायर पुन:स्तरीकरण
केंद्रे, 573 बसस्थानके, 4277 प्रवासी
निवारे व 1,03,107 कर्मचारीवर्ग अशी
अवाढव्य यंत्रणा निर्माण केलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांना
कार्यक्षम दळणवळण सुविधा निर्माण व्हावी
याकरिता ''गांव तेथे रस्ता'' असे धोरण
अंगिकारलेले आहे. या धोरणास पुरक ''रस्ता
तेथे एस.टी.'' असे धोरण महामंडळाने
अंगिकारलेले आहे. त्याचप्रमाणे महामंडळाने
''बहूजन हिताय बहुजन सुखाय'' व ''प्रवाशांच्या
सेवेसाठी'' यास अनुसरुन रस्ते प्रवासी
वाहतूक सुविधा नागरिकांसाठी पुरविलेली आहे.
महाराष्ट्र शासनाचे प्रवासी वाहतूकविषयक
धोरण आणि त्यास अनुसरुन महामंडळाने
निर्माण केलेले प्रवासी वाहतुकीचे जाळे
याचा हातभार राज्याच्या सर्वांगीण
विकासावर झालेला असून राज्याच्या विकासात
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा मौलिक वाटा
आहे.
|